Theft of gold तहसीलदारांच्या पत्नीचे सोन्याची दागिने चोरी ; केज बस स्थानकातील घटना.

केज दि.15 सप्टेंबर – Theft of gold बसमध्ये चढत असलेल्या खुलताबादच्या तहसीलदारांच्या पत्नीने पर्स मध्ये ठेवलेले पाच तोळे वजनाचे सोन्याची दागिने चोरट्यांनी पळवल्याची खबळजनक घटना केज बस स्थानकात घडली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वरूप कंकाळ यांची पत्नी मयुरी कंकाळ या त्यांच्या दोन मुलांसह सासरी धारूर येथे गौरी-गणपतीच्या सणा निमित्त आल्या होत्या. सण संपल्या नंतर दि.13 सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास त्या केज येथील बस स्टँड वरून संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना चोरीची घटना घडली. त्यांच्या सोबतच्या मोठ्या पर्स मधील एका लहान पर्स मध्ये ठेवलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व नगदी 1700 रू. असे एकूण 1 लाख 41 हजार 700 रु. किमतीचे दागिने व रोकड हे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सदर दागिन्यांची आजची किंमत जवळजवळ 3 लाख 70 हजार रुपये होते.
या प्रकरणी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची पत्नी मयुरी कंकाळ यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 498/2024 भा. न्या. सं. 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.