धनंजय मुंडे दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह; लॉकडाऊन विषयी जिल्हा प्रशासनाची आज पत्रकार परिषद …

बीड दि.24 मार्च – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दुसर्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, काल पासून जिल्ह्यात लॉकडाऊनच्या चर्चेने जोर धरला असून या संदर्भात सकाळी 11 वाजता जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती व घोषणा होण्याची शक्यता आहे.
(Dhananjay Munde positive for the second time; District administration’s press conference today about lockdown …)
राज्यात कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संसर्गात आजवर अनेक राजकीय व्यक्ती कोरोना बाधित (Corona Positive) झाली आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच काही मंत्री कोरोना बाधित आढळली होती. यात जयंत पाटील, छगन भुजबळ यांचाही समावेश होता. दुसऱ्या लाटेत पुर्वी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दुसर्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
याबाबत ट्वीटमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे, माझी आज दुसर्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona virus) वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच काल सांयकाळी जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन (lockdown) होणार असल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. काहीनी स्वागत तर काहीनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला.
याबाबत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून आज दि.24 बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक ए. राजा व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित राहणार आहेत. यावेळी लॉकडाऊन (lockdown) विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.