पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा खदाणीत बुडून मृत्यू; बीडजवळ पांगरबावडी शिवारातील घटना.

बीड दि.16 एप्रिल – पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड शहरापासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात आज दि.१६ एप्रिल शुक्रवार रोजी सांयकाळी उघडकीस आली. दोन तास शोध मोहिमेनंतर तिघांचे मृतदेह (Dead Body) खदाणीतून बाहेर काढण्यात यश आले.
(Three youths who went for a swim drowned in a mine; Incident in Pangarbawdi Shivara near Beed.)
बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम गणेश जाधव (वय १७ रा. गांधीनगर बीड), शाम सुंदर देशमुख (वय १७ रा. राजीव नगर बीड ), मयुर राजेंद्र गायकवाड (वय १४ रा. गांधीनगर बीड) असे खदाणीत बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. ते तिघेही दुचाकीवरून सकाळी ११ वाजता पोहण्यासाठी बीड शहराजवळील बायपास रोड लगत असलेल्या पांगरबावडी शिवारातील खदाणीत गेले होते.
दरम्यान, उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी खदाणीकडे नेहमी पोहण्यासाठी ते जात असल्यामुळे याठिकाणी पाहणी केली असता खदाणीच्या काठावर कपडे व दुचाकी आढळून आली. त्यानंतर तात्काळ याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना (Police) देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने खदाणीत सायंकाळी शोध सुरु केला. तब्बल दोन तासांच्या शोध मेहिमेनंतर तिघांचे मृतदेह खदानीतून बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरिक्षक पवनकुमार राजपुत, रोटे, पो.कॉ. आनंद मस्के, राऊत, सानप, दुबाले, जायभाये, तांदळे आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी पंचनामा करून पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) आर.वाय आदमाने, जी.बी ढोकणे, साबळे, प्रदीप वडमारे या जवानांनी मृतदेह (Dead Body) खदाणीतून बाहेर काढण्याची कार्यवाही केली. खदाणीत मुले बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर नातेवाईकांनी मोठ्या संख्येने खदाणीकडे धाव घेतली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहिमेत मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडत आक्रोश केला.