फेसबूकवरुन मैत्री, व्हाट्सअप वरील संवादातून एकावर गुन्हा नोंद….

सोशल मेडियाच्या माध्यमातून गैरप्रकार वाढले
वाई दि.७:- फेसबुकच्या माध्यमातून केलेली मैत्री एका महिलेस चांगलीच अडचणीची ठरली. फेसबुक (Facebook) मैत्रीतून व्हाट्सअप (Whatsapp) संवादापर्यंत आलेल्या संबंधातून तिचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर (Social media) प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी सागर तुकाराम सोनवलकर (वय 28, रा. वडले, ता. फलटण) याला वाई पोलिसांनी अटक केली.
अलिकडे फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम सारखे अनेक ॲप तरुणांसह वयस्करांत मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या सोशल माध्यमाचा (Social media) वापर चांगला तेवढाच धोक्याचाही ठरत आहे. असाच एक वाईट अनुभव वाई तालुक्यात कुटुंबीयांसह राहणाऱ्या एका 35 वर्षीय विधवा महिलेस आला. सुमारे आठ महिन्यांपूर्वी फेसबुकवर (facebook) उघडलेल्या अकाउंटवर आलेल्या विनंतीवरून या महिलेची सागरशी मैत्री झाली. त्यातून दोघांमध्ये फेसबुक व व्हॉटसऍपवर (Whatsapp) संभाषण (चॅंटिंग) सुरू झाले. सागरने या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सागरने व्हिडिओ कॉल करण्यास सांगून त्याचे फोटो काढले. अश्लील फोटोची मागणी केली. त्याच्याकडून वारंवार अशी मागणी वाढू लागल्याने महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर सागरने मुलींची लग्न होऊ देणार नाही, तसेच अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्याचा राग मनात धरून सागरने महिलेच्या अकाउंटवरील अश्लील छायाचित्र पीडितेच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर व समाज माध्यमावर (Social media) पाठवली. या त्रासाला कंटाळून महिलेने वाई पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सागर तुकाराम सोनवलकर यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस (Police) निरीक्षक आनंदराव खोबरे तपास करीत आहेत.