बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन…. पहा काय आहे सत्य

बीड दि.23 मार्च- बीड जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन गंभीर आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बीड जिल्ह्यात 10 दिवसांसाठी लॉकडाऊन (lockdown) करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.
(10 days lockdown in Beed district?)
बीड जिल्ह्यासाठी मागचा पंधरवाडा कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग वाढणारा ठरला आहे. गेल्या आठवडाभरात दररोज दोनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी जिल्ह्यात 24 तासात तब्बल 336 कोरोना बाधित आढळून आली होती. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. यातच जिल्हा प्रशासनाने लावलेले निर्बंध पाळण्यात कुचराई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यातील माजलगाव शहरात मंगळवारी सर्व हॉटेल, खाणावळी, बार, रेस्टॉरंट, चहा स्टॉल व पान टपरी संपुर्ण बंदचा आदेश काढण्यात आला. मंगळवारी जिल्ह्यात आलेली कोरोना बाधितांची संख्या दोनशे पार होती. यामुळे प्रशासनाकडून कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. याबैठकीत जिल्ह्यात किमान दहा दिवसांचा संपुर्ण लॉकडाऊन (lockdown) लावण्याचा निर्णय झाल्याची खात्रीशीर माहिती आहे.
शहरासह ग्रामिण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील कोविड सेंटर खचाखच भरली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी दि.27 मार्च पासून 10 दिवसासाठी होण्याची शक्यता आहे. 27 मार्च ते 4 एप्रिल असा दहा दिवसांचा लॉकडाऊन लवकरच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) हे अधिकृत आदेश जाहीर करतील. जिल्हा प्रशासनाने उद्या दि.24 बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.