50 आगारांतील वाहतूक सुरू, बीडसह तीन जिल्ह्यात बसवर दगडफेक; कारवाईत वाढ.

मुंबई दि.28 नोव्हेंबर – विलिनीकरणाच्या मुद्यावर अद्यापही बहुतांशी एसटी कर्मचारी (ST employees) संपावर असून काही ठिकाणी मात्र एसटीच्या संपात फूट पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. शनिवारी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांनी डय़ुटीवर हजेरी दाखवत सेवा बजावण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर, रायगड आणि नाशिकसह (Nashik) महत्त्वाच्या 50 आगारांतील वाहतूक शनिवारी सुरू झाली. मात्र बीड (Beed), नाशिक, जळगाव व सोलापूर जिल्ह्यात बसेसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यातच एसटी प्रशासनाकडून कारवाईत वाढ करण्यात आली आहे.
(Traffic resumes at 50 depots, stone pelting on buses in three districts including Beed; Increase in action.)
रात्री एसटी प्रशासनाकडून (ST corporation) मिळालेल्या आकडेवारीनुसार विविध आगारांतून 1046 बसेस सोडण्यात आल्या असून त्यातून 17,726 प्रवाशांनी प्रवास केली. दरम्यान, इतके दिवस शांततेत सुरू असलेल्या संपाला गालबोट लागले असून जळगाव, सोलापूर (Solapur), नाशिक आणि बीड अशा ठिकाणी 11 ते 13 बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
कुठे धावली बस.
एसटीचे संपात रुतलेले चाक पुन्हा फिरू लागले असून रायगड जिह्यातील माणगाव आगार दीर्घकालीन संपानंतर सर्व कामगार डय़ुटीवर हजर झालेले पहिले आगार ठरले. तर कोल्हापूर (Kolhapur) जिह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, चंदगड या आगारांतील वाहतूक सुरू झाली. तर नाशिक विभागाच्या नाशिक-1 आगारातून 15 लाल परी बसेस रवाना झाल्या. कोल्हापूर जिह्यातील रंकाळा ते हुपरी मार्गावर पहिली एसटी धावल्याने शालेय विद्यार्थ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे स्वागत करीत आभार मानले. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई व गेवराई रस्त्यावर तब्बल वीस दिवसानंतर बस धावली.
रत्नागिरी जिल्ह्यात एसटीचे 342 कर्मचारी शनिवारी कामावर हजर असून चालक-वाहकांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात सुमारे 50 फेऱ्यांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सुमारे 50 फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यापैकी देवरूख आगारातून सर्वांत जास्त, 16, तर त्या खालोखाल दापोली (14), चिपळूण (12), राजापूर (8) आणि खेड (2) या आगारांमधूनही गाडय़ा सोडण्यात आल्या.
बसेसवर दगडफेक.
नाशिक विभागात तीन बसेसवर दगडफेक झाली. बीड आगार तसेच जळगाव विभागाच्या चार बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर सोलापूर विभागाच्या दोन बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या आहेत. दापोली येथे असलेल्या एसटी बसवर रात्री 8 वा.सुमारास दगडफेक झाल्याने या संपाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी 18,090 कर्मचारी हजर, शनिवारी 3010 निलंबन.
एसटी महामंडळातील 18,090 कर्मचारी शनिवारी डय़ुटीवर हजर झाले असून त्यात प्रशासकीय विभागाचे 8,671, कार्यशाळेचे-5,177, चालक 2130, वाहक 2112 असे 18,090 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर शनिवारी 3010 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित (suspend) कर्मचाऱ्यांची संख्या 6277 झाली आहे. आज 270 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली असून एकूण 1496 जणांची सेवा समाप्त झाली आहे, तर 240 कर्मचारी नोटिसीनंतर हजर झाले आहेत.
बीडमधील धारुर आगारात 23 कर्मचारी निलंबित.
बीड जिल्ह्यातील धारूर (Dharur) एस टी आगारातील सर्वच कर्मचारी 22 दिवसापासून संपावर आहेत. अधिकारी व शासनाकडून कारवाईचा बडगा दाखवत कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. आतापर्यंत या आगारातील 23 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात 11 तर दि.26 नोव्हेंबरला 12 कर्मचारी निलंबीत (suspension) करण्यात आले. मात्र अद्यापही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.