धारुर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली; आठ महिन्यात चार मुख्याधिकारी !

किल्ले धारूर दि.6 सप्टेंबर – धारुर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली जालना जिल्ह्यात झाली आहे. विशाल साहेबराव पाटील हे गेल्या पाच महिन्यापासून येथील रिक्त असलेल्या पदावर परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी (गट ब) म्हणून काम पाहत होते. त्यांच्या बदलीमुळे नगर परिषदेत अवघ्या आठ महिन्यात आता चौथे मुख्याधिकारी कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.
( Transfer of Chief Officer of Dharur Nagar Parishad; Four principals in eight months! )
धारूर (Dharur) नगर परिषदेला (Municipality) दोन वर्ष मुख्याधिकारी म्हणून काम करणारे नितीन बागुल यांची बदली नाशिक जिल्ह्यात सटाणा नगरपालिकेत झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार माजलगाव (Majalgoan) नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे देण्यात आला होता. जानेवारी महिन्यांपासून नगर परिषदेवर प्रशासक म्हणून माजलगावच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती बाफणा यांच्याकडे पदभार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने (Department of Urban Development) दि.16 मार्च रोजी काढलेल्या आदेशानूसार किल्लेधारूर नगर परिषदेला विशाल पाटील यांच्या रुपाने पदाचा मुख्याधिकारी मिळाला. मात्र अवघ्या पाचच महिन्यात त्यांची बदली जालना जिल्ह्यातील बदनापुर येथे झाली आहे.
पाटील यांनी आपल्या पाच महिन्याच्या काळात लोकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेणारा मुख्याधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. शहराच्या नवीन होत असलेल्या कुंडलिका पाणी पुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित यंत्रणेला वेळोवेळी लेखी सुचना देवून आरणवाडी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जलवाहीनीचे काम पुर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शहरात सध्या पाणी पुरवठा योजनेसह छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व इतर विकासकामे प्रलंबित असून त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे विकासकामांना पुन्हा खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धारुर नगर परिषदेसाठी अद्याप नव्या मुख्याधिकाऱ्यांचे आदेश निघालेले नसून दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.