नित्रुड खून प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; माजलगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.

माजलगाव दि.31 मे – माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत नोव्हेंबर 2017 साली दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. खून (Murder) करणाऱ्या दोन आरोपींना माजलगाव येथील सत्र न्यायालयाने आज सोमवार दि.31 रोजी जन्मठेपेची ( life imprisonment ) शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील नित्रुड येथील भागवत बाबुराव गायके या तरुणाचा 20 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता माजलगाव तेलगाव रस्त्यालगत पिल्लू डाके यांच्या शेताजवळ दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. मयताची आई कौशल्याबाई गायके यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब उर्फ बंडू उत्तमराव डाके (वय 38 वर्ष), शिवाजी उत्तम डाके (वय 36 वर्ष), दिनकर किसन उर्फ लाला डाके, (वय 31 वर्ष), दत्ता माणिक डाके (वय 37 वर्ष) (सर्व राहणार नित्रुड ता. माजलगाव) या आरोपींनी खून केल्याची फिर्याद दिली होती.
सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिंद्रुड पोलिसांनी सदर गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करत तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र माजलगाव येथील सत्र न्यायालयात ( Sessions Court ) 5 मार्च 2018 रोजी दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण बावीस साक्षीदार तपासण्यात आले ज्यामध्ये प्रताप महादेव बडे यांच्यासह 22 साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सदर प्रकरणाकडे संपूर्ण माजलगाव तालुक्याचे लक्ष लागलेले होते.
या प्रकरणातील दोन आरोपी बाळासाहेब उर्फ बंडू उत्तम डाके (वय 38 वर्ष) व शिवाजी उत्तम डाके (वय 36 वर्ष) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व चाळीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. दत्ता माणिक डाके व दिनकर किसन डाके यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अपर सत्र न्यायाधीश एस पी देशमुख यांनी हा निकाल दिला असून सरकारी वकील आर. ए. वाघमारे यांनी सरकार पक्षाच्या बाजूने काम पाहिले. डी ए वायकर हे फिर्यादीचे वकील होते. ॲडवोकेट पी.एन. मस्कर व एन. एस. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक आसिफ सय्यद व पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्हि. सी. जाधवर व पि. डी. नरवडे यांनी सहकार्य केले.
( Two accused in Nitrud murder case sentenced to life imprisonment; Important decision of Majalgaon Sessions Court. )