तिन वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या महिलेस सश्रम कारावास; बीड न्यायालयाचा आदेश.

बीड दि.27 मे – पतीशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या तिन वर्षाच्या मुलाची हत्या करुन मृत मुलाचा मृतदेह नदीत फेकणाऱ्या महिलेस बीड सत्र न्यायालयाचे प्रमुख सत्र न्या. हेमंत महाजन यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शारदा श्रीराम शिंदे (रा. शाहूनगर, बीड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सदर खूनानंतर बीड शहरात एकच खळबळ उडाली होती. याबातची माहिती अशी की, शारदा शिंदे या महिलेचा पती श्रीराम शिंदे याचे शहरातील अंकुशनगर भागातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरुन शारदा आणि त्या महिलेत नेहमी वाद होत असत. सन 2019 मध्ये शारदाने एके दिवशी घरात झोपलेल्या सार्थकला पळवून नेले.
यानंतर धानोरा रोड बीड ते अंकुश नगर बीड जाणाऱ्या रोड वरील पुलाजवळील कर्परा नदीच्या पात्रातील पाण्यामध्ये बुडवून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सार्थकचा मृतदेह कर्परा नदीच्या पात्रात फेकून दिला. याप्रकरणी सार्थकच्या आईच्या फिर्यादीवरून शारदा उर्फ शामल श्रीराम शिंदे हिच्या विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. संशयित आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व घटनास्थळावरील पंचनामा आणि पुराव्याचे अवलोकन करून व सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन प्रमुख न्यायाधिश हेमंत महाजन यांनी आरोपी शारदा शिंदे हिला दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रूपयांचा दंड सुवानला. दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
( Woman jailed for murdering three-year-old boy; Beed court order. )