बीड जिल्ह्यात आयसीएमआरकडून सीरो सर्वेक्षण; पहा कोणत्या तालुका व शहरातील घेतले नमुने.

बीड दि.22 जून – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण व समूहातील संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी आयसीएमआरकडून (ICMR) सीरो सर्वेक्षण (Sero Survey) करण्यात येत आहे. सीरो सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात दि.21 सोमवार रोजी बीड जिल्ह्यातील 10 गावांतील 500 लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले.
(Sero survey from ICMR in Beed district; See the samples taken in which taluka and city.)
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत यापूर्वीच सेरो सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. याचा चौथा टप्पा सोमवार दि.21 जून रोजी सुरु करण्यात आला. सीरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा अभ्यास करुन तर्क मांडले जातात. शरीरातील प्रतिजैविक व समुह संसर्गाचे प्रमाण यातून निष्पन्न होते. देशभर अशा स्वरुपाचा सीरो सर्वे (Sero Survey) करण्यात येत आहे.
बीड तालुक्यातील येळंबघाट, आंबेसावळी, पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील डोंगरगन, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, माजलगाव तालुक्यातील एकदरा, धारूर तालुक्यातील हिंगणी खूर्द, परळी तालुक्यातील धर्मापूरी, माजलगाव शहरातील वॉर्ड क्रमांक चार, केज शहरातील वॉर्ड क्रमांक सात येथील नागरिकांचे रक्त नमुने पथकाने घेतले.
घेण्यात आलेल्या रक्त नमुन्याच्या तपासणीनंतर याचा अहवाल आयसीएमआरकडून राज्य शासनाला देण्यात येतो. बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्वेक्षणस्थळी आरोग्य विभागाच्या लातूर परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी पांढरवाडी (ता. गेवराई) गावाला भेट देत आढावा घेतला. तसेच येळंबघाट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्वेक्षणालाही माले यांनी भेट दिली.
WHO व AIIMS चा सीरो सर्वे अहवाल.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि एम्सनं (AIIMS) केलेल्या सीरो सर्वेक्षणातील आकडेवारी दिलासा देणारी आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना वयस्करांच्या तुलनेत अधिक धोका नसेल, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांमधील SARS-CoV-2 सीरो पॉझिटिव्हिटी रेट (Sero positivity rate) जास्त असल्याचं सर्वेक्षण (Survey) सांगतं. देशाच्या 5 राज्यांमधील 10 हजार व्यक्तींचा सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेतील अंतरिम आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. तर अंतिम आकडेवारी लवकरच अपेक्षित आहे.