होय… महाराष्ट्रात सुरु झाली कोरोनाची दुसरी लाट! केंद्र शासनाने दिल्या सुचना.

मुंबई दि.16 मार्च- गेल्या पंधरवड्यात राज्यात कोरोना कहर पहायला मिळत आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता गेल्या आठवड्यात केंद्रीय पथकाने महाराष्ट्राला (Maharashtra) भेट दिली होती. यानंतर केंद्राकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची (second wave) सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर देण्याची सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी केली आहे. केंद्रीय पथकाने महाराष्ट्राला भेट देवून दिलेल्या अहवालानंतर भुषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवलं आहे.
(Yes … the second wave of corona started in Maharashtra! Instructions given by the Central Government.)
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची (second wave) सुरवात झाली आहे. मात्र शोध, चाचणी आणि कोरोना बाधितांचे (Corona Positive) अलगीकरण आणि संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण मर्यादित स्वरूपात होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही नागरिकांची वर्तणूक ही कोरोनाचे निर्बंध पाळणारी नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे भूषण यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण राज्यात 1:20 आहे. सकृतदर्शनी हे प्रमाण खूप जास्त वाटत असले तरी प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपर्कातील व्यक्ती ही संकल्पना पुरेशा स्पष्टपणे समजली नाही. त्यामुळे ते कुटुंबातील व्यक्ती आणि शेजाऱ्यांचा संपर्क म्हणून उल्लेख करत आहेत, अशी पुस्तीही त्यात जोडली आहे.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी, अंशत: लॉकडाऊन, सुटीच्या दिवशीचे लॉकडाऊन इत्यादी उपाय योजनां करण्यात येत आहेत. मात्र याचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी केंद्राच्या सुचनांप्रमाणे करावी, असे त्यात म्हटले आहे.
राज्यात पॉझिटिव्हिटी प्रमाण (Positivity ratio) 13.21 टक्के आहे. बरे होण्याचे प्रमाण 92.81 टक्के आहे. तर मृत्यू दर 2. 28 टक्के आहे हा दर साथीच्या सुरवातीपासूनच्या आकडेवारीवर आधारित आहे. होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा. टेस्ट पॉझिटीव्हीटी रेट (Positivity ratio) 5 टक्क्यांपेक्षा कमी करा. तसंच प्रत्येक पॉझिटीव्ह रूग्णाचे 20-30 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा, कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा, असा सल्ला केंद्राने दिला आहे.
यापुढच्या सूचनांमध्ये उल्लेख करण्यात आलेले सगळे महत्त्वाचे भाग आणि त्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना यांचं कठोरपणे पालन करण्यात यावं. सोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि गृह विभागाने कोव्हिड 19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि वेळोवेळी सांगण्यात येणारी मार्गदर्शक तत्वं यांचंही पालन संसर्ग रोखण्यासाठी करण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.