कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी जमा केली दगड!
गटविकास अधिकाऱ्यांचा प्रताप

किल्लेधारूरः दि.३ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयमध्ये नेमणूक केलेले कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे त्यांची पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गुरुवारी सुनावणी घेतली . सांगूनही कामाला येत नसल्यामुळे त्यांना मारण्यासाठी चक्क गटविकास अधिकाऱ्यांनी संतापून दगड जमा केले होते. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोरोना संकट आल्यामुळे तालुका आरोग्य विभागामध्ये डाटाएंट्री ऑपरेटर ची गरज होती. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी पंचायत समितीकडे संगणकावर काम करणारे कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी चार ग्रामपंचायत डाटाएन्ट्री कर्मचारी यांची आदेशाद्वारे नेमणूक केली होती. परंतु सदरचे कर्मचारी हे गत दीड महिन्यापासून कामावर हजर झाले नाहीत. दरम्यान दि. २ जुलै रोजी पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती यांनी गटविकास अधिकारी यांना बोलावून पंचायत समितीच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावेळी बैठकीनंतर गटविकास अधिकारी यांनी आण्णासाहेब तिडके, सद्दाम सय्यद, अकबर पठाण या ग्रामपंचायत डाटाएंट्री कर्मचारी कामावर गेले नाहीत यांना बोलावून त्यांची सुनावणी ठेवली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर तीन कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांच्या दालनात बोलावण्यात आले होते. त्याअगोदर गटविकास अधिकारी यांनी येथील शिपाया मार्फत दहा ते बारा दगड आणून टेबलवर ठेवले होते. सदरील दगड टेबलवर ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जे कर्मचारी कामावर जात नाही व ऐकत नाहीत अशांना आता दगडा शिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी चक्क दालनातच दगड जमा केले होते. या प्रकारामुळे डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांमध्ये ही दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गटविकास अधिकारी यांच्या या प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.