चंद्र दर्शनाने पवित्र रमजान मासारंभ

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) पवित्र रमजान महिन्याचे आज दि.२४ शुक्रवार रोजी चंद्र दर्शन झाले असुन आज रात्री पासुनच रमजान महिन्याची इबादत सुरु होवून उद्या पहिला रोजा असणार आहे. चंद्र दर्शनाच्या शुभेच्छा मुस्लिम समाजास सर्वस्तरातून देण्यात येत आहेत.
इस्लाम धर्मियात अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिना चंद्राच्या तारखेप्रमाणे इस्लामिक दिनदर्शिकेनुसार सुरु होतो. या महिन्यात आदल्या रात्री तरावीहच्या नमाजने सुरुवात होवून पहाटे रोजेदार सहर करुन रोजास सुरुवात करतात. या महिन्यात पवित्र कुराणची तिलावत, नमाज, रोजा व जकात सारख्या इस्लामच्या मुलतत्वांचा अंमल मुस्लिंमाकडून केला जातो. शेवटी ईदच्या नमाजने या महिन्याची सांगता होते. या पवित्र महिन्याला पहिल्यांदाच लॉकडाऊनचे ग्रहण लागले आहे. अत्यंत काटेकोर अमंल होणाऱ्या या महिन्यात यामुळे मशिदीत इबादत करण्यास मुकावे लागणार आहे. शासकिय स्तरावर सर्वांना याबाबतीत सुचना देवून घरीच सर्व इबादत, रोजा, नमाज अदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे आवाहन सर्व मौलवीकडूनही करण्यात आले आहे. आज झालेल्या चंद्र दर्शनानंतर मुस्लिम समाजासह सर्वच धर्मियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.