धारुरहून निघालेले मध्यप्रदेशचे ५१ लोक सिमेवर पोहोचले
परप्रांतियांना घेवून बस धावली; उत्तर प्रदेशचे २३ जन प्रतिक्षेत

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील बस स्थानकावरुन रात्री अकरा वाजता मध्यप्रदेशच्या ५१ जनांना घेवून निघालेल्या तीन बसेस महाराष्ट्र मध्यप्रदेश च्या शहापुर सिमेवर सकाळी पोहोचले असल्याची माहिती आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी दिली. अद्याप उत्तर प्रदेशचे २३ जन शासनाच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांतून येथील मध्यप्रदेशच्या जिनिंग मजूरासह ५१ लोकांना त्यांच्या मुळगावाकडे परतण्याची परवानगी रात्री उशिरा मिळाली. येथील बस स्थानकात थांबवण्यात आलेल्या त्या ५१ लोकांना राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस मधून रात्री ११ वाजता तहसीलदार वंदना शिडोळकर व पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले. परप्रांतिय लोकांना राज्याच्या सिमेवर सोडणारी बहुधा धारुर आगाराच्या या पहिल्याच बसेस असतील. यावेळी बस चालकांना पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तिन्ही बसेसमधील ५१ प्रवाशांना मुक्ताईनगर पासुन जवळच असलेल्या मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेवर मध्यप्रदेश पोलिसांकडे रितसर उतरवण्यात आल्याची माहिती बस चालक सुधाकर फुटाणे यांनी दिली. या मजूरांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेत तहसील प्रशासनाचे कारकुन देवकते एम. जे., डि.एस. पतंगे व पोलिस प्रशासनातील गुप्तवार्ता विभागाचे पो.कॉ. वखरे यांनी अत्यंत महात्वाची जबाबदारी पार पाडली. मजूरांना निरोप देण्यासाठी शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, रापम कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबले होते.