लोणार सरोवराचे पाणी यामुळे झाले “गुलाबी”

लोणार दि.११(प्रतिनिधी) जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवर सध्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने चर्चेत आले असून रंग बदलण्याची ही क्रिया म्हणजे रासायनिक प्रक्रिया असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
५६ हजार वर्षापूर्वी उल्कापातातून निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्याने लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. या सरोवराच्या पाण्यात क्षारता मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अंमलीय घनताही फार आहे. सरोवरातील झरे बंद झाल्याने पाणी कमी होण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत रासायनिक प्रक्रीया होवून पाण्याचा रंग लालसर होण्याचे प्रकार घडतात. सध्या लोणार सरोवरातही अशीच रासायनिक प्रक्रीया घडल्यामुळे पाण्याचा रंग लालसर गुलाबी झाला असून पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा पाण्याच्या रंगात बदल होवून हिरवट निळा होईल असे जानकारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. उल्कापातातून निर्माण झालेल्या सरोवरात लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.