“त्या” आठ मोरांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे नव्हे… हत्येचा अंदाज

बीड: दि.२८- शिरुर तालुक्यात पाच मोरांचा बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी आठ मोर मृत आढळली होती. मात्र या आठ मोरांचा बर्ड फ्ल्यू (Bird flu) अहवाल निगेटिव्ह (Negative) आल्याने संभ्रम निर्माण झाला असून सदरील मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सदरील प्रकाराकडे विष प्रयोग करुन मोरांची हत्या केली का? म्हणून तपास होत आहे.

शिरुर कासार तालुक्यात लोणी शिवारात गेल्या आठवड्यात तेरा मोरांचा (Peacocks) मृत्यू झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या मृत्यूमुळे निसर्गप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात होती. बर्ड फ्लूचे (Bird flu) सावट असल्यामुळे मोरांचा (Peacocks) मृत्यू सदरील आजाराने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. सदरील मृत मोरांचे वनविभागाने पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत नमुने रोगनिदान अहवालासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. पहिल्या दिवशी ज्या पाच मोरांचा मृत्यू झाला होता त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह (Positive) आल्यामुळे दुसऱ्या दिवशी जे आठ मोर मयत झाले त्यांना देखील बर्ड फ्लूची बाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु तो अंदाज पूर्णपणे चुकला असून त्या आठ मोरांचा अहवाल बर्ड फ्लू निगेटिव्ह (Negative) आल्यामुळे पक्षी प्रेमी व नागरिकांत खळबळ उडाली आहे. या आठ मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा प्रश्न निर्माण झाला असून विषप्रयोग करून मोरांना मारण्यात आले का? या दृष्टीने तपासणी सुरू असल्याची माहिती डॉ.सुरेवाड यांनी दिली आहे. याप्रकरणी वनविभागाने सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!