धारुरच्या तेजलचा लातुरात डंका… दहावी परिक्षेत १००%

किल्लेधारूर दि.३० (प्रतिनिधी) काल जाहीर झालेल्या दहावीच्या परिक्षेत धारुर तालुक्यातील भोगलवाडी गावच्या कु. तेजल रामहरी मुंडे या मुलीने पैकीच्या पैकी म्हणजे १००% गुण मिळवत लातूरात नावलौकिक मिळवत इतिहास घडवला आहे. तेजलचे वडिल रामहरी मुंडे हे एका खाजगी दवाखान्यात कंपाउंन्डर आहेत. रात्रंदिवस कष्ट करून तेजलच्या उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करताना मिळालेल्या यशामुळे भारावून गेले आहेत.
धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील मुळ रहिवासी असलेले रामहरी मुंडे २५ वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी लातुरला स्थायिक झाले. गोरगरीबांची मदत करण्याचा छंद जोपासत कठिण परिस्थितीत मुंडे यांनी तेजलचे शालेय शिक्षण पुर्ण केले. लातुर येथील देशी केंद्र माध्यमिक विद्यालयातुन तेजलने दहावीची परिक्षा दिली. या परिक्षेत तेजलने नेत्रदिपक यश मिळवत पैकीच्या पैकी १००% गुण मिळवले. भोगलवाडी गावात आतापर्यंतच्या इतिहासात दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेऊन यश संपादन करणारी तेजल ही एकमेव मुलगी ठरली आहे. तिच्या रूपाने लातूरच्या शिक्षण पंढरीत भोगलवाडी, या डोंगर पट्ट्यातील गावचा झेंडा फडकला. तेजलच्या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. येथील ठाकुर उदयसिंह दिख्खत, पत्रकार राम कुलकर्णी, ठाकुर विजयसिंह, ठाकुर सुजितसिंह, विठ्ठल क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले.