धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; महिनाभरात तिसरी घटना.

किल्लेधारूर दि.14 नोव्हेंबर – धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead Body)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली . थेटेगव्हाण येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून धारूर पोलीस ठाण्यात (Dharur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
धारुर तालुक्यातील चोरांबा, थेटेगव्हाण जवळ असलेल्या येथील चारशे फूट उंच डोंगरावर एका लिंबाच्या झाडाला 40 ते 45 वय असलेल्या इसमाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी गुरे चारणाऱ्या व्यक्तींना आढळून आला . येथील पोलीस पाटील यांना सदर घटना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर धारूर (Dharur Police Station) पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची खबर देण्यात आली. सदर इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे. आत्महत्या (Suicide) करणारी व्यक्ती ही अज्ञात असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असल्याने पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह होता. कापडी गंमजाच्या सहाय्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. भोगलवाडी येथील आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी उत्तरीय तपासणी करून चोरांबा येथील गायरानामध्ये अंत्यविधी करण्यात आला .
काही दिवसांपुर्वी धारुर घाटात (Dharur Ghat) व कारी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असताना आज चोरांबा शिवारात सदरील मृतदेह आढळून आला. महिन्यातील ही तिसरी घटना आहे. वारंवार अशा घटना निदर्शनास येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
( Body of unknown person found again in Dharur taluka; Third incident in a month. )