क्राईम न्यूज… बीड जिल्ह्यात खळबळजनक घटना; कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे.

अंबाजोगाई दि.31 अॉगस्ट – गेली काही दिवस जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. डुकराच्या शिकारीच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून निर्माण झालेल्या वादात रायगड नगर परिसरातील रवी धोत्रे (वय 32) या युवकाच्या घरात घुसून 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना अंबाजोगाईत (Ambajogai) आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघत असल्याचे दिसत आहे.
(Crime News … Beed district shakes again; Murder of a youth by breaking into a house.)
आज दि.31 अॉगस्ट मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अंबाजोगाई शहरातील रायगड नगर भागात राहणारा युवक रवी धोत्रे वय 32 हा त्याच्या घरात होता. चार ते पाच युवकांनी त्याच्या घरी जाऊन धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केल्याची घटना घडली. सदरील घटना मयत युवकाच्या घरात घडली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
हा प्रकार डुकरांच्या शिकारी वरून निर्माण झालेल्या पैश्याच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात आणखी दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते. जखमींना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात (SRTR) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत. उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.