कोरोना अपडेट… बीड जिल्ह्यात दिलासा मात्र राज्यात धडकी भडवणारी संख्या.

मुंबई दि.3 जानेवारी – मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर केंद्रासह राज्य सरकारने कोरोनाला रोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात आज दुसऱ्यांदा बाधितांची संख्या निरंक असून राज्यात मात्र रविवारी धडकी भरवणारी आकडेवारी आली आहे.
(Corona update … Relief in Beed district but shocking number in the state.)
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात रविवारी देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. तब्बल 11 हजार 877 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.
राज्यात 50 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 510 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन (Omicron) देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय. गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत 7 हजार 792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत येत्या दोन दिवसात मुंबईत निर्बंध (restrictions) लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनूसार आज 523 संशयितांचा अहवाल आला असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यात सध्या 39 ॲक्टीव रुग्ण आहेत. तर एकुण मृत्यूची संख्या 2840 आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट (Positivity rate) 0.8 वर आलेला असल्याने कोरोनाची सद्यस्थिती समाधानकारक आहे.