बीडमध्ये महिलेची छेड, व्हिडीओ का काढला म्हणून विचारताच कुटूंबाला बेदम मारहाण.

बीड दि.19 मे – बीडमध्ये दोन दिवसांपुर्वीच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विवाहित तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. महिलेची छेड काढून व्हिडीओ बनवला याचा जाब विचारायला गेलेल्या पीडितेच्या परिवाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीडमध्ये दोन दिवसांपुर्वी एका 26 वर्षीय विवाहित तरुणीवर दोघांनी जीवघेणा हल्ला केला. पोलिस भरतीची पुर्व तयारी करणाऱ्या सदर तरुणीवर पहाटे पाचच्या सुमारास दोन गुंड प्रवृत्तीच्या रोडरोमिओंनी तिच्यासमोर गाडी आडवी लावून “तुझं स्कार्फ सोड, मला तुझा फोटो काढायचा आहे.” असं म्हणत त्या गुंडांनी चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
बीड तालुक्यातील कामखेडा या गावातील सदर प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ सोशल माध्यमातून समोर आला आहे. या व्हिडीओत लाठ्या-काठ्यासह तुफान हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती प्रमाणे बीड तालुक्यातील कामखेडा गावात पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत छेड काढून व्हिडीओ बनवल्याचा प्रकार घडला आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
( A woman’s piercing in a Beed. Asking why the video was taken, the family was beaten to death. )