धारुर तालुक्यातील युवा अभियंत्याचे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; प्रा. नागरगोजे यांना पुत्रशोक.

किल्लेधारूर दि.27 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील युवा अभियंता दुष्यंत नागरगोजे यांचे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने (cardiac arrest) निधन झाले. धारुर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर नागरगोजे यांचे ते कनिष्ठ पुत्र होते. अवघ्या 26 व्या वर्षी झालेल्या दुष्यंत नागरगोजे यांच्या निधनामुळे नागरगोजे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धारुर (Dharur) तालुक्यातील घागरवाडा येथील मुळनिवासी मधुकर नागरगोजे यांचे कनिष्ठ चिरंजीव दुष्यंत नागरगोजे सध्या पुण्यात वास्तव्यास होते. दुष्यंत नागरगोजे यांनी मेकानिकल इंजिनियरींग पुर्ण केल्यानंतर पुण्यात एक्साईड (Exide) कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. दररोजप्रमाणे अज सकाळी कंपनीत कामावर जाण्याच्या तयारीत आपल्या चारचाकी वाहनाची साफसफाई करताना दुष्यंत यांना अस्वस्थ वाटले. यावेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा (Heart attack) धक्का आला. यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांना पुण्यातील धन्वंतरी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अवघ्या 26 व्यावर्षी नागरगोजे परिवारातील उमदा तरुण गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी व दिड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. मधुकर जनार्दन नागरगोजे सध्या अंबाजोगाई येथे स्थायिक आहेत. दुष्यंत नागरगोजे यांचा अंत्यविधी अंबाजोगाई येथे बुधवार दि. 28 रोजी सकाळी आठ तीस वाजता बोरुळ तलाव काशी विश्वनाथ मंदिर शेजारी रविवार पेठ येथे होणार आहे.
( A young engineer from Dharur taluka died of cardiac arrest in Pune. )