बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणणाऱ्या भावाचे अपघाती निधन…

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणण्यासाठी गेलेल्या भावावर काळाने घाला घातला असून परळी बीड (Beed) मार्गावरील तपोवन जवळ ट्रॕक्टरला दुचाकी धडकल्याने भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

तालुक्यातील शेरी तांडा येथील शिवाजी चव्हाण यांच्या मुलीचे आज शनिवारी दुपारी १ वाजता लग्न होते. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ सचिन शिवाजी चव्हाण (२३) आपल्या चुलत भावासह सिरसाळा येथे फटाके आणण्यासाठी गेला होता. बीड (Beed) परळी रस्त्यावर तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपावरुन डिझेल भरुन बाहेर पडणाऱ्या ट्रॕक्टरला त्याची मोटार सायकल क्र. एमएच २० एफ ६८९५ धडकली. या अपघातात (Accident) सचिनचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला चुलत भाऊ नितिन आप्पासाहेब चव्हाण (२२) गंभीर जखमी झाला. नितिन यास पुढील उपचारासाठी लातुरला हलवण्यात आले.

अपघाताची (Accident) घटना कळताच तांड्यावर शोककळा पसरली. बहिणीचं लग्न अवघ्या चार तासावर असताना भावावर नियतीने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी चव्हाण हे औरंगाबाद येथे शिक्षक आहेत. लॉकडाऊन पासून ते कुटूंबियासह गावाकडे असल्याचे कळाले. त्यांना तीन मुली तर अपघातात मयत झालेला सचिन हा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती मिळाली. घटनेनंतर बहिणीचा साध्या पध्दतीने विवाह उरकण्यात आला. सांयकाळी ५.३० च्या सुमारास मयत सचिनवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!