कंत्राटदाराचे घर फोडून बारा तोळे सोने व २५ हजार रुपये लंपास….

औरंगाबाद:दि.१५(प्रतिनिधी) हर्सूल परिसरातील कंत्राटदाराचे घर फोडून चोरांनी बारा तोळे सोने व २५ हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. १४) राजे संभाजी कॉलनीत उघडकीस आली़.
पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक कंत्राटदार असलेले संतोष लक्ष्मण जाधव (रा. राजे संभाजी कॉलनी, छत्रपती हॉलमागे) रविवारी सकाळी कुटुंबासह त्यांचे मुळगाव सांजोळ (ता. फुलंब्री) येथे कामानिमित्त गेले होते. सोमवारी सकाळी शेजाऱ्याने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याचे सांगितले. हि माहिती समजताच संतोष जाधव यानी घराकडे धाव घेतली. त्यावेळी बेडरुममधील कपाट फोडून चोरांनी त्यातील साहित्य बाहेर फेकल्याचे दिसून आले. कपाट उघडून पाहिले असता त्यातील बारा तोळ्याचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोख चोरीला गेल्याचे समोर आले. गॅलरीमधील सीसीटीव्ही कॅमेराही वरच्या दिशेने फिरवून डिव्हीआर त्यांनी चोरी केल्याचे आढळले. या प्रकारानंतर संतोष जाधव यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हर्सूल पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्यासह गुन्हे शाखा निरीक्षक अनिल गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकाच्या माध्यमातून माग काढला.