राष्ट्रवादीच्या शेख महेबुब यांना क्लिनचीट? गृहमंत्री देशमुख यांची मोठी घोषणा

औरंगाबादः दि.३०- महिला अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर देखील यापुढे कारवाई केली जाणार, असे सांगताना गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काल बोलताना औरंगाबादेतील `त्या` तक्रारीचा दाखला दिला. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या तक्रारीतील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी (NCP) युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांना क्लिनचीट (Clean chit) दिली का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
महिन्यापुर्वी दि.२६ डिसेंबरला औरंगाबादेतील सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख (Mehboob Shaikh) यांच्या विरोधात बलात्काराची (Rape) तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल झाला होता. यानंतर मेहबूब शेख यांनी तक्रार दाखल झालेली व्यक्ती मीच आहे की अन्य कुणी याचा पोलीसांनी तपास लावावा. माझी आणि तक्रारदार महिलेची नार्को टेस्ट करावी व दोषी आढळून आल्यास फासावर लटकवावे असे म्हणत तक्रारदार महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. परंतु आपल्यावर अत्याचार करणारा आरोपी हा राष्ट्रवादी युवकचा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख हाच आहे, असा दावा तक्रारदार महिलेने केला होता. प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. सदर महिलेच्या तक्रारी वरुन पोलिसांनी बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विरोधी पक्ष भाजपने राज्यभरात आंदोलन करत शेख यांना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच पोलीसांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप केला होता. परंतु सुरूवातीपासूनच या प्रकरणाकडे पोलीसांनी (Police) तांत्रिक गुन्हा म्हणून पाहत तपास केला. या संदर्भात मेहबूब शेख यांच्यासह तक्रारदार महिलेचा जबाब पोलिसांनी घेतला. यानंतर काही दिवसातच पोलिसांनी (Police) याबाबत शेख महेबूब यांच्या बाबतीत खुलासा दिला होता. आता ती तक्रार खोटी होती, अशी माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत दिली. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या या विधानाला पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी देखील दुजोरा देत लवकरच आम्ही सदर महिलेचा जबाब आणि इतर सर्व कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महेबूब शेख यांना एकप्रकारे क्लिनचीटच (Clean chit) मिळाल्याचे बोलले जात आहे.