सैन्य भरतीनंतर वैद्यकीय तपासणीला आलेल्या
तरूणाचा पोहताना बुडून मृत्यू.

नांदेड दि.24 मे – सैन्य भरतीत निवड होवून वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या एका 21 वर्षीय तरूणाचा नदीत पोहत असताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि 23 मे रोजी विष्णूपुरी परिसरातील काळेश्वर मंदिराच्यामागील गोदावरी नदी पात्रात घडली.
लोहा तालुक्यातील वाळकी खुर्द येथील रहिवासी संतोष पंडीतराव कदम हा 21 वर्षीय तरूण काही दिवसांपूर्वी सैन्यात भरती झाला. 23 मे रोजी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सैन्यात भरती झालेल्या तरूणांची वैद्यकीय तपासणी होती. या वैद्यकीय तपासणीसाठी संतोष कदम व त्याचे अन्य मित्र विष्णूपुरी येथे आले.
वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर संतोष कदम हा मित्रांसोबत विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वरांच्या मंदिरात गेला. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गोदावरी नदीचे पात्रात उतरला. त्याचवेळी, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संतोषचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत संतोष कदम यांचे चुलतकाका तसेच वाळकी खुर्द (ता. लोहा) येथील शेतकरी सुरेश शंकर कदम यांनी सदर घटनेची माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार तुकाराम नागरगोजे यांना दिली. मयत संतोष कदम यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व एक विवाहित बहिण, मेहूणे, एक भाचा व एक भाची असा परिवार असून, वडील पंडीत कदम हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.
याप्रकरणी सुरेश शंकरराव कदम यांनी दिलेल्या माहितीचेआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. सैन्य भरती झालेल्या संतोष कदम यांचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाळकी व कापशी गुंफा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
( Coming for medical examination after military recruitment Young man drowns while swimming. )