अमरसिंह पंडित यांची अनोखी घोषणा…

गेवराईः दि.१३(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस शनिवारी (दि.१२) बीड जिल्ह्यात विविध सामाजिक, आरोग्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांनी अनोखी घोषणा केली.
भारतीय सैन्यदलात भरती होणाऱ्या गेवराई मतदार संघातील प्रत्येक युवकांच्या परिवारातील विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामान्य कुटुंबातील तरुणांना देश रक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा या निमित्ताने मिळणार आहे. मतदार संघातील किसन दराडे, आकाश सांगडे, मारोती बोरकर, महादेव राठोड, भगवान ढाकणे, योगेश मुंडे, राजकुमार नाकाडे, करण मोंढे, उमेश गोरे, संतोष गरड, विशाल डोंगरे, महेश काळे, ऋषिकेश इथापे, शहाजी थिटे, पवन महारगुडे, गणेश जोगदंड हे तरुण नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांच्या हस्ते या युवकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस सर्वांनाच उर्जा देणारा असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशप्रेमाची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंडित म्हणाले. मतदार संघातून अधिकाधिक युवक सैन्यदलात भरती व्हावेत, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.