बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा आज फैसला; वडवणी, शिरुरची उत्सूकता…

बीड दि.14 फेब्रुवारी – बीड जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या पाच नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा फैसला आज (दि.14) सोमवारी होणार आहे. केज, आष्टी, पाटोद्यातील नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने निवड बिनविरोध होणार आहे. तर शिरुर व वडवणीत आज मतदान होणार असल्याने उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
( Decision of the mayors and vice-presidents of five Nagar Panchayats in Beed district today; Wadwani, Shirur’s curiosity … )
शिरूरमध्ये अध्यक्षपदासाठी दोघांचे अर्ज दाखल आहेत. संपूर्ण बीड ( Beed ) जिल्ह्याचे लक्ष वडवणीकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी वडवणीत चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे. केज, आष्टी व पाटोद्यात मात्र आज नगराध्यक्ष पदाची औपचारिक घोषणा होणार असून उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतच्या ( Municipal council ) अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आज सोमवारी निवडणूक होत आहे. आष्टी, केज आणि पाटोदा या नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी कोण असणार हे निश्चित झाले आहे. मात्र, सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिरूरमध्ये अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र बहुमत भाजपाकडे असल्याने शिरूरचा नगराध्यक्षही ( Mayor ) जवळपास निश्चित आहे.
वडवणीत चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत वडवणी बचाव आघाडीकडे 9 जागा आहेत तर भाजपच्या ताब्यात 8 जागा आहेत. वडवणीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी स्वत: पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ), आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांनी फिल्डींग लावली आहे. पंचेवीस दिवसांपासून दोन्ही गटाचे नगरसेवक अज्ञातस्थळी होते. या दोन्ही गटाचे नगरसेवक ( corporator ) बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वडवणीकडे लागले आहे.
असे आहे नगराध्यक्ष आरक्षण …
मिळालेल्या माहितीप्रमाणे आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. तर केज (Kaij) नगर पंचायत अनु.जाती व जमाती (SC) सर्वसाधारण तर वडवणी नगर पंचायत सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित आहे.
कोण असणार नगराध्यक्ष ?
केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जनविकास आघाडीच्या सीता बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला. त्या केज नगरपंचायतीच्या अविरोध नगराध्यक्ष ठरणार आहेत. आष्टी नगराध्यक्ष पदासाठी रंगनाथ धोंडे यांच्या सुन पल्लवी स्वप्नील धोंडे तर पाटोदा नगराध्यक्ष पदासाठी जि.प.चे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्या भावजई सय्यद खतीजाबी अमर यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. या नावांची आज नगराध्यक्ष म्हणून घोषणा होईल.
वडवणी व शिरुरमध्ये कोणात लढत ?
वडवणी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर बचाव आघाडीकडून जगताप वंदना शेषराव यांचा तर भाजपकडून मंगला राजाभाऊ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. तर शिरुर कासार नगराध्यक्ष पदासाठी आ.धस यांच्याकडून प्रतिभा रोहिदास गाडेकर यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नगराध्यक्ष पदासाठी शेख शयाना नसीर यांचा अर्ज दाखल आहे.