बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी केली निदर्शने.

बीड दि.25 जुन – महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक भूमिका घेत आहेत. यातच बीडमध्ये मात्र शिवसेनेचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भुमिका स्पष्ट केली नसल्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली.
गेली पाच दिवस महाराष्ट्रात राजकीय स्थिती अस्थिर झाली असून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळजवळ 40 आमदारांनी बंड पुकारले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे शिवसैनिकात प्रचंड रोष दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यभरात शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातही शिंदे प्रकरणाचे पडसाद दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले पोस्टर हटवून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज पुन्हा बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले दिसून आले. शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली कोणतीही भूमिका मांडली नसल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर जाऊन निदर्शने (Demonstration) केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
बंडखोर यांना दिलेला वेळ संपला असल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत, बंडखोर आमदार यांच्या कार्यालय, घर यांना लक्ष केले आहे. काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड सुद्धा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशात अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणे पसंद केले आहे.
जयदत्त क्षीरसागर ( Jaydatta Kshirsagar ) यांनीही वेट अँड वॉचची भुमिका घेतली असून हीच भूमिका शिवसैनिकांना पटली नसल्याचे आज दिसून आली आहे. शिवसैनिकांनी या भुमिकेचा राग व्यक्त करत क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. ठाकरे कुटुंबीयांनी अल्पावधीत क्षीरसागर कुटुंबाला आमदारकीसह कॅबिनेट मंत्रीपद दिले. मात्र आता जयदत्त क्षीरसागर कुठे आहेत? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
( Demonstration of Shiv Sainiks in front of Jaydatta Kshirsagar’s house in Beed. )