दीड महिन्यात सर्वांचे सण, उत्सव , जयंती साधेपणानेच साजरे झाले आता रमज़ान ईदही घरातच करू – सलीम जहाँगीर

बीड दि.६ ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यात गुडीपाडवा , शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, महावीर जयंती , शब ए बारात, महाराष्ट्र दिन आदी सण- उत्सव साधे पद्धतीने साजरे झाले. आता रमजान ईदही घरात बसूनच साजरी करू असा विश्वास जिल्हा सनियंत्रण दिशा समितीचे सदस्य तथा भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केला. आताही कोविड -१९ ची परिस्थिती गंभीर आहे. घरातून बाहेर पडणे आणि गर्दी करणे म्हणजे कोरोनाला बोलावून घेण्यासारखे आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचे गांभीर्य पाहता लोकांनी ईद साध्या पध्दतीने घरातच साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात सलिम जहाँगीर यांनी कोविड – 19 आजाराचा फैलाव होऊ नये म्हणुन तातडीने उपाययोजना राबविल्याने देशात , राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य झाले, त्याबद्दल अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. मात्र सध्या विषाणू संसर्गाचा कोविड – १९ आजाराचा अंतिम टप्पा असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गर्दीची साखळी तोडण्यासाठी झोनची संकल्पना दूर ठेवून १४ दिवसांचे म्हणजेच ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती. सध्या काही ठिकाणी गर्दी वाढत आहे. पर राज्यातील, जिल्ह्यातील ऊसतोड मजूर आणि अन्य क्षेत्रातील मजूर व कामगार आप आपल्या जिल्ह्यात परत आली आहेत. अशावेळी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. महत्त्वाचे सर्व धर्मीय सण – उत्सव अगदी साध्या पद्धतीने आणि घरातच साजरे झाले. त्याचप्रमाणे आता रमजान ईदही सर्व मुस्लिम समाज बांधव घरातच आणि साधे पद्धतीने साजरी करतील. ईद पुढच्या वर्षीही येईल मात्र मानव जातीचे जीवन अनमोल आहे, ते पुन्हा नाही. केंद्र सरकारने गोर गरिबांना तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही गॅस मोफत देण्यात येत आहे. अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहणे हीच सर्वात मोठी उपाययोजना ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी कोणत्याही शॉपिंग सेंटरला किंवा दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देवू नये. त्याचबरोबर ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन अशी सूट न देता सरसगट १०० टक्के लॉकडाऊन ठेवावा. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक वेळच द्यावा अशी मागणी सलीम जहाँगीर यांनी केली होती. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे जनतेने अधिक सतर्कता बाळगावी व ईद साध्या पध्दतीने घरातच साजरी करावी असे आवाहन सलिम जहाँगिर यांनी केले आहे.