परप्रांतियांचा चेंडू पुन्हा पोलिसांकडे
तालुक्यातील ८३ परप्रांतिय परवानगीच्या प्रतिक्षेत

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) तालुक्यातील विविध राज्यातून आलेल्या परप्रांतियांना गावाकडे परतण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाकडे माहिती पुरवावी लागणार असून तालुक्यातील ८३ परप्रांतिय परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
तालुक्यात विविध कारणांसाठी आलेल्या परप्रांतिय नागरिकांपैकी जवळजवळ शंभर लोक लॉकडाऊन मुळे अडकली होती. येथील पोलिस ठाण्यासह, नगर परिषद व तहसील प्रशासनाकडे यापुर्वीही या परप्रांतिय लोकांनी परतीसाठी आपल्या संपूर्ण माहितीसह विनवणी केली आहे. दि.८ रोजी तहसीलदार वंदना शिडोळकर यांची पत्रकार सय्यद शाकेर यांनी परप्रांतिय लोकांसोबत भेट घेवून प्रशासनाकडे विनंती केली होती. तहसीलदार शिडोळकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून संबंधित परप्रांतिय लोकांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या. यावर आज पुन्हा नवीन आदेश येवून परराज्यात रेल्वे किंवा बसने परतण्यास इच्छूक असलेल्या परप्रांतिय लोकांनी पोलिसांकडे विहीत नमुन्यात अर्ज करण्याची सुचना देण्यात आली आहे. तालुक्यातील ८३ परप्रांतिय यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलिसांकडे माहिती देण्यासाठी पोलिस चौकीत परप्रांतियांनी गर्दी केली आहे. सततच्या हेलपाट्याने परेशान झालेले परप्रांतिय प्रशासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.