आज पासून देशात सिनेमागृह तर राज्यात आठवडे बाजार होणार सुरु; दुकानेही राहतील रात्री ९ पर्यंत खुली.

बीडः दि.१५(प्रतिनिधी)- गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह (cinema hall) आज देशभरात सुरु होत असून महाराष्ट्रातही सात महिन्यापुर्वी बंद झालेले आठवडे बाजार आज सुरु होत आहेत. यासोबतच मुंबई लोकलच्या फेरी वाढ व मेट्रो सुरु होत आहेत. सहा महिन्यापासून सायंकाळी 6.30 वाजता बंद होणारी जिल्ह्यातील बाजारपेठ आता आज गुरुवारपासून (दि.15) रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. कंटेनमेंट झोन बाहेरील जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजारही सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
मार्चमध्ये लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाल्यापासून देशातील सिनेमागृह, (cinema hall) आठवडे बाजार बंद होती. जूनमध्ये अनलॉक (unlock) ४ मध्ये जिल्ह्यात दुकाने 6.30 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. आजपर्यंत हिच वेळ कायम होती. त्यानंतर आता बुधवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार कंटेटमेंट झोन वगळून जिल्ह्यातील ऑनलाईन – दुरस्थ शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये अध्यापक वर्ग व अध्यापकां शिवाय कर्मचाऱ्यांची कोणत्याही वेळी 50 टक्के उपस्थिती ऑनलाईन शिक्षण व तत्सम कामासाठी मान्य असणार आहे. आजपासून आयटीआय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, किंवा राज्य शासनाकडे नोंदणी केलेल्या सर्व अल्प मुदतीच्या प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षण देण्यास परवानगी असणार आहे. तसेच राज्य विद्यापीठ, खासगी विद्यापीठांनाही अशीच परवानगी देण्यात आली आहे. आजपासून सर्व शासकीय व खासगी ग्रंथालय, अभ्यासिका यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून नियमावली देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्याने, पार्क व इतर सार्वजनिक खुली ठिकाणे चालू राहणार आहेत. व्यावसायिक संबंधित प्रदर्शनेही चालू ठेवता येणार आहेत असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.