हप्ता देवूनही पोलिसांचा त्रास… गुटखा विक्रेत्याने दिली आत्महत्येची धमकी….

मुंबई: दि.२७- बंदी असलेल्या गुटखा (Gutkha) विक्रीसाठी पोलिसांना दहा हजार रुपये महिना देवूनही दुकानात २ गोणी गुटखा सापडला म्हणून मारहाण करत गुन्हा न दाखल करण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार मीरा भाईंदरमधील गुटखा विक्रेत्याने पोलीस (Police) आयुक्तांकडे केली. तसेच समाज माध्यमावर (Social Media) देखील त्याने स्वतःचा व्हिडीओ टाकून कारवाई करा असे म्हटले आहे. कारवाई न केल्यास आत्महत्येचा (Suicide) इशारा त्याने दिला आहे. दरम्यान आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुनिब गुप्ता असे या तक्रारदार गुटखा विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड येथे मुनिब गुप्ता याचेचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. त्याने २५ डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, तो राज्यात बंदी असूनही दुकानात गुटखा (Gutkha) विकतो. गुटखा विक्रीची माहिती नवघर पोलिसांना असून दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता त्यासाठी दिला जात होता. गुरुवारी (दि. २४) नवघर पोलिस (Police) ठाण्यातील कर्मचारी वाघ, गिरगावकर यांनी आपल्या दुकानात येऊन झडती घेतली असता त्यांना दुकानात २ गोणी भरून गुटखा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास करीत आपल्याला घरी नेले. तेथे पत्नी व मुलांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ३२८ कलमानुसार गुन्हा दाखल केल्यास तुरुंगात राहावे लागेल आणि सुटण्यास खूप खर्च करावा लागेल. अडीच ते तीन लाख रुपये दे मग गुन्हा दाखल करणार नाही असे धमकावत पैशांची मागणी केली. सदर रक्कम शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दे असे पोलिसांनी बजावले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी गुप्ता ह्याने मीरा-भाईंदर व वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी तक्रार करून मारहाण व लाच मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करत सोशल मेडियातून (Social Media) आत्महत्या (Suicide) करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांना चौकशी करून ५-६ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.