आडसमध्ये शेततळ्यात पडून तरूणाचा तर दगडवाडीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू.

केज दि.30 जून – शेतातील शेततळ्यातील पाईपलाईनचे झाकण बसविण्यास गेलेल्या तरूणाचा तोल जाऊन शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि.30 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आडस येथे घडली. तर नेकनुर जवळील दगडवाडीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली.
(In Adas, a young man fell into a field and a woman fell into a well in Dagdawadi.)
केज तालुक्यातील आडस शिवारात असणाऱ्या कळमआंबा रस्त्यावरील सर्वे नंबर 222/4 मधील आपल्या शेतात शेततळ्यातील पाइपलाइनचे झाकण लावण्यासाठी मोरेश्वर रामचंद्र जोशी (वय-21) हा गेला होता. झाकण लावताना त्याच्या शरीराचा तोल गेल्याने तो शेत तळ्यातील पाण्यात पडला. त्यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
ही घटना जवळच शेतात काम करणाऱ्या शेतगड्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो लवकर मिळून आला नाही. तोपर्यंत घटनेची माहिती समजताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना (Police) देताच पोलीस शिपाई तेजस वाव्हळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Autopsy) अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
मयत तरूण हा पुण्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. कोरोनाच्या काळात महाविद्यालय बंद असल्याने तो मागील दीड वर्षांपासून गावी शेतावर आई-वडीलांसोबत राहत होता. एकुलता एक असणाऱ्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आईने फोडलेला हंबरडा हा उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.
पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू
बीड तालुक्यातील नेकनूर जवळील दगडवाडी शिवारात विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या राधा किशोर लोखंडे (वय 30) रा. दगडवाडी वस्ती नेकनुर या महिलेचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. आजूबाजूला कोणीच नसल्याने महिलेला वाचवण्यासाठी कोणीच आले नसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पीएसआय जाधव, पो. कॉ. सोनवणे, होमगार्ड कोरडे, डोईफोडे मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दोन दिवसांपासून शेतातील लाईट नसल्याने बीड तालुक्यातील दगडवाडी शिवारातील हनुमान मंदिराजवळील बाळू काळे यांच्या विहिरीतून (well) पाणी आणण्यासाठी सदरील महिला गेली असतांना पाय घसरून विहिरीत पडली. विहिरीत (well) जास्त पाणी असल्याने आजू बाजूला कोणीच नसल्याने महिलेचा बुडून मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या महिलेला शवविच्छेदनासाठी (Autopsy) नेकनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेकनूर पोलीस (Police) करत आहेत.