आडस धारुर वडवणी पाडळसिंगी रस्त्याबाबत आ. सोळंकेंनी उपस्थित केला विधिमंडळात प्रश्न… कामाला होणार सुरुवात.

किल्ले धारूर दि.26 फेब्रुवारी – धारूर (Dharur) वडवणी व आडसहून जाणाऱ्या पाडळसिंगी ते लोंखडी सावरगाव राज्य रस्ता क्रमांक 232 या रस्त्याचे काम तात्काळ व्हावे या साठी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोंळके (Prakash Solanke) यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. यामुळे या कामाला वेग आला असून या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. एकुण 65 कि.मी. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निधी उपलब्ध झाला आहे.
( Lokhandi Savargaon Adas Dharur Padalsingi Road MLA Solanke raises questions in the legislature … )
अनेक प्रमूख शहरांना जोडणाऱ्या राज्य रस्ता क्रमांक 232 गेल्या काही वर्षात राष्ट्रीय महामार्गात (National Highway) रुपांतरीत होणार याची चर्चा होती. तर या रस्त्यासाठी धारुरकरांनी थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही साकडे घातले होते. मात्र या रस्त्याचा विकास शासनाच्या लाल फितीत अडकून दुर्लक्षितच राहिला. परिणामी आडसपासून धारुर, वडवणी ते पाडळसिंगीपर्यंत खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशा स्थितीत आला.
या रस्त्याचा बराच भाग माजलगाव (Majalgoan) मतदारसंघात असल्याने आमदार प्रकाशराव सोळंके यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत पाठपुरावा केला. या नियोजित रस्त्यामुळे अनेक प्रमुख शहरे जवळच्या अंतराने जोडली जाणार असून विकासाला चालना मिळणार आहे.
पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव हा 85 कि.मी. चा रस्ता आहे. लातूर, औरंगाबाद, अहमदनगर आदी शहरांना जोडणारा हा रस्ता आहे. राज्यमार्ग म्हणून या रस्त्याचे काम पुर्वी होणार होते. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने राज्य शासनाने या रस्त्या वरील निधी रद्द केला. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते व या 85 कि मी रस्त्याचे दुरावस्थेला प्रवाशी वैतागले होते.
2017 मध्ये या रस्त्याचे 171.36 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र पाच वर्षात वस्तूचे दर वाढल्याने हे पुर्ण काम 252.83 कोटी रुपयाचे झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) राज्य रस्ता क्रमांक 232 चे पाडळसिंगी ते आडस पर्यंत 65 कि.मी चे काम पुर्वी बनवलेल्या 171.36 कोटी रुपयात होऊ शकते. या रस्त्याची डांबरीकरणाची लांबी सात मिटर तर दोन्ही बाजूने दिड मिटर माती काम असे 10 मिटरचा रस्ता होणार आहे.
या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या रस्त्यासाठी फक्त 23.90 कोटी रुपये निधीची तरतूद 2020-21 च्या अर्थसंकल्पात केली आहे. हा निधी अपूरा असल्याने वाढीव निधीची मागणी बांधकाम विभागाने केली आहे. प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अंदाजपत्रक मंजूरीचे प्रक्रीयेत आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यअभियंता दि. द. उकिडे यांनी वरीष्ठ कार्यालयास पत्रयवहार केला आहे.
या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे तात्काळ सर्व निधी द्यावा या बाबत या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्रकाशराव सोंळके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. या रस्त्यामुळे रस्त्याशी जोडणाऱ्या सर्व गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.