रानडुकरांमुळे बैल बिथरली ; धारुर तालुक्यात बैलगाडी तलावात जावून आजोबा व नातवाचा बुडून मृत्यू.

किल्लेधारूर दि.22 डिसेंबर – अचानक बैलगाडी समोर आलेल्या रानडुकरांमुळे बैल बिथरले अन बैलगाडी बाजुच्या तलावात गेल्याने आजोबा व नातवासह एक बैल दगावल्याची दुर्दैवी घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे घडली. या घटनेत एक बालक सुदैवाना बचावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील कासारी येथील शेतकरी सय्यद कबीर बाशुमिया (वय 70) हे आपल्या दोन नातंवडासह बैलगाडीने आज दुपारी एकच्या सुमारास आपल्या शेतात जात होते. वाघदरा तलावाशेजारील (Lake) रस्त्याने जात असताना बैलगाडीसमोर अचानक रानडुकरांनी (wild boar) धुम ठोकली. यामुळे बैलगाडीला जुंपलेली बैलं बिधरली अन बैलगाडी थेट तलावात गेली. जवळजवळ 50 फुट पाण्यात बैलगाडी गेल्याने या बैलगाडीत असलेले सय्यद कबीर व सोबत असलेला नातू अजमत अखिल सय्यद (वय 10) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा नातू अतिक अखिल सय्यद (वय 12) हा एका बैलावर बसल्यामुळे बचावला.
यावेळी सदर घटना शेजारी शेतात असलेल्या मोतीराम सदाशिव उघडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे परिसरात असलेल्या शेतकऱ्यांनी तलावाकडे येवून बचावकार्य केले. मात्र तोपर्यंत एका बैलासह नातू व आजोबांनी जीव गमावला. सदर घटनेनंतर दिंद्रुड पोलिसांनी (Police) पंचनामा केला असून दोन्ही शव धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे कासारी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यातील मयत अजमत हा कासारी येथील जि.प. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता.
( The bull was broken by the wild boars; Grandfather and grandson drowned in Dharur taluka after bullock cart went into lake. )