धारुर माजलगावमधून लाखोंची मदत ; असामान्य ते सर्वसामान्य मदतीला सरसावले.

किल्लेधारूर/माजलगाव दि.22 सप्टेंबर – माजलगाव धरणावर मदतकार्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील केडीआरएफचे जवान राजशेखर मोरे यांचा धरणात बुडून दुर्दैवाने मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात असणाऱ्या कुटूंबीयांसाठी माजलगाव पत्रकार संघ, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ यांच्या वतीने एक हात मदतीचा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीमध्ये माजलगावकरांनी उत्स्फुर्त सहभाग घेत 19 लाख 24 हजार 240 रूपयांची तर धारुर तालुक्यातून जवळजवळ 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली.
डॉ. दत्ता फपाळ यांचा माजलगाव धरणात (Majalgoan Dam) बुडालेला मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापुर येथुन केडीआरएफचे (KDRF) जवान राजशेखर मोरे हे आले होते. परंतु मच्छीमारांच्या जाळ्यात अडकुन त्यांचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. मोरे यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई, वडीलांचा आधार हरवला. त्यामुळे गरिब कुटूंबीयांच्या मदतीसाठी माजलगाव पत्रकार संघ, रोटरी क्लब, व्यापारी महासंघाने पुढाकार घेत एक हात मदतीचा मदतफेरी शहरातुन आज दि. 21 सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात जवान चंद्रशेखर मोरे यांना श्रध्दांजली अर्पण करून फेरीची सुरूवात करण्यात आली. या फेरीत उत्स्फुर्तपणे सहभाग घेत माजलगावकरांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये 19 लाख 24 हजार 240 रूपयांची आर्थिक मदत जमा झाली असुन ही मदत लवकरच त्यांच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या फेरीत दातृत्व दाखवत असामान्य ते सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवला.
धारुरमधून झाली आर्थिक मदत
धारुर शहरातही पत्रकारांच्या वतीने सोशल माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही तासात जवळजवळ 40 हजारांची मदत जवान मोरे यांच्या खात्यावर जमा झाली. धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव येथेही पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या आवाहनानंतर जवळपास पावने दोन लाख रुपयांची रक्कम मदत जमा झाली. आजही मदत गोळा केली जाणार असून यात जास्तीत जास्त दानदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
( Millions of aid from Dharur Majalgaon; The extraordinary rushed to the aid of the ordinary.)