तेलगावचे ट्रामा केअर युनिट धूळखात पडून; आरोग्य विभागाने लक्ष दिल्यास होतील 40 अॉक्सिजन बेड कार्यान्वित.

किल्लेधारूर दि.24 एप्रिल – सध्या राज्यात कोरोना संकटात अॉक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नव्याने अॉक्सिजन प्लांट उभारणी सुरु केली आहे. जिल्ह्यातही सहा ठिकाणी हवेतून अॉक्सिजन निर्माण करणारे प्लांट (Oxygen production plant) उभारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र धारुर तालुक्यातील अनेकांचे प्राण वाचविण्यास पात्र असलेल्या ट्रामा केअर युनिट (Trauma Care Unit) सध्या आरोग्य विभागासह शासन व प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याचे दिसुन येत आहे.
(Telgaon’s Trauma Care Unit falling to dust; If the health department pays attention, 40 oxygen beds will be operational.)
सध्या धारुर तालुक्याला पदाचा तालुका आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणा डेपाळली आहे. गतवर्षी तालुक्यासह जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची पदवी उत्तर अभ्यासक्रमासाठी अंबाजोगाई येथे बदली झाली. यामुळे येथील तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार गेल्या अनेक वर्षांपासुन कागदोपत्री सुरु असलेल्या नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला.
नेमके याच काळात गेल्या महिन्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. सध्या तालुक्यात सुरु असलेले अनेक मोहिमेत कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडून साधे सुरक्षा पुरवणारी मास्क, सॕनिटायझर, ग्लोजसारख्या वस्तूही पुरवण्यात आलेली नाहीत. तर तालुक्यात तेलगाव येथील ट्रामा केअर यूनिट (Trauma Care Unit) सारखी अद्ययावत आरोग्य यंत्रणा असताना तालुका आरोग्य विभागाकडून दुर्लक्षित आहे. या सुसज्ज इमारतीत तब्बल चाळीस ऑक्सिजन पॉईंट काढलेले आहेत. म्हणजेच चाळीस अॉक्सिजन बेड (Oxygen bed) उपलब्ध आहेत.
या कोरोनाच्या महामारीत ही बिल्डिंग सध्या धूळ खात पडून आहे. यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन येथे कुठलीही सोय उपलब्ध करता येते. हा दवाखाना चालू केल्यानंतर 100 बेड उपलब्ध होऊ शकतात. तर येथे 40 अॉक्सिजन बेड (Oxygen bed) अगदी सहजतेने कार्यान्वित होवू शकतात. त्यामुळे तेलगाव व तेलगाव परिसरातील अनेक रुग्णांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील अत्यस्वस्थ रुग्णांना संजीवनी देणाऱ्या या ट्रामा केअरला तात्काळ सुरु करण्याची मागणी या भागातून होत आहे.
जिल्ह्यातील बीड, परळी, आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज येथील रुग्णालयातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट (Oxygen production plant) उभा करण्यासाठी ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. यात तेलगावचे ट्रामा केअर युनिट समाविष्ट केल्यास धारुर व वडवणी तालुक्याची गैरसोय दुर होणार आहे. आ. प्रकाशदादा सोळंके यांचा ट्रामा केअर युनिटचा महत्वकांक्षी प्रकल्प यामुळे लोकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी प्रकल्प ठरणार आहे. ट्रामा केअर युनिट सुरु करण्याची मागणी नागरीकांतून पुढे येत आहे.