अंबाजोगाईच्या पोखरी शिवारात बिबट्याच्या अफवेने दहशत;
वनविभागाकडून खुलासा

अंबाजोगाई दि.९(प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरालगत साधारण तीन किमी अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात गेली दोन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. काल सायंकाळी एका मोठ्या काळवटीचा फडशा पाडल्याचे आढळून आले. या परिसरातील नागरिकांनी हा बिबट्या (Leopard) सदृश्य प्राणी दिसल्याची माहिती दिल्यावर आज याभागात आढळून आलेल्या पायाच्या ठशावरुन व लावण्यात आलेल्या सीसीटी कॕमेरात कैद झालेल्या प्राण्यावरुन तो बिबट्या नसल्याचे वनविभागाने (Forest Department) खुलासा केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई (Ambajogai) शहरालगत अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात गेली दोन दिवसापासून बिबट्या फीरत असल्याचे या विभागातील शेतकरी जहागीरदार व इतर शेतकऱ्यांनी पाहिले होते. ही चर्चा शहरात होत असतांनाच ७ फेब्रुवारी च्या रात्री पोखरी शिवारातील बेजगमवार व जाधव या दोघांच्या शेताच्या बांधालगत एका मोठ्या काळवटीचा फडशा पाडला असल्याचे आढळून आले. ही माहिती वाऱ्या सारखी पसरताच या विभागातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून घटनास्थळास भेट देवून पहाणी केली. अर्धवट फस्त केलेले काळवीट दिसून आल्याची माहिती वनविभागाला (Forest Department) दिली. या विभागातील शेतकऱ्यांनी वन विभागाचे अधिकारी भगवान गीत्ते व कर्मचारी यांनी घटनास्थळी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांसह भेट दिली असता मृत काळवीटाच्या अंगावर सकाळपेक्षा अधिक मांस खाल्ल्याचे दिसून आल्यामुळे अधिक घबराट पसरली. या घटनेची पाहणी केल्यानंतर वन अधिकारी भगवान गीत्ते शेतकऱ्यांशी चर्चा करतांना या परीसरात आढळुन आलेल्या पायाच्या ठशाची पहाणी करीत काळवीट फस्त केलेला प्राणी हा बिबट्या आहे की तडस आहे अशी शंका उपस्थित करीत बिबट्या (Leopard) हा प्राण्याची हत्या करतांना नरडीचा घोट घेवून हत्या करतो व तो प्राण्याचे मांस हाडासह खावून टाकतो असे सांगत हा प्राणी तडस असण्याचीच अधिक शक्यता वर्तवली. या घटना स्थळाजवळच अंगद कराड यांच्या शेतात शेततळे आहे. या शेततळ्यावर हा प्राणी पाणी पिण्यासाठी गेला आहे का याची पहाणी केली असता या शेततळ्याच्या परीसरातही या प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. या सर्व प्रकारामुळे व हे घटनास्थळ अंबाजोगाई (Ambajogai) शहरापासून अवघे तीन किमी अंतरावर असल्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांमध्ये व परीसराच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी परळी तालुक्यातही अशा स्वरुपाच्या अफवा आल्या होत्या.
सतर्कता बाळगण्याचे वन अधिकाऱ्याचे आवाहन
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वन अधिकारी भगवान गीत्ते यांनी या विभागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती सतर्कता बाळगत सावधगिरी बाळगण्याच्या सुचना केल्या आहेत. या विभागात वावर असणारा प्राणी हा नेमका बिबट्या आहे की तडस हे याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने सीसीटीव्ही लावले असता यात कोल्हा व कुत्र्यांचे चित्रीकरण झाले. यामुळे सध्या तरी बिबट्या (Leopard) असण्याची शक्यता वन विभागाने फेटाळली आहे.