राघवेंद्र जिनिंगचे कार्यालय फोडून 15 लाखाचा मुद्देमाल लंपास; 13 किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश.

मानवत दि.22 जुलै – मानवत शहरातील रिंग रोडवर असलेले राघवेंद्र जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख 8 लाख 70 हजार व कार्यालयाच्या देवघरात ठेवलेले 14 किलो चांदीचे दागिने असा एकूण 15 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री नंतर घडली. या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
(Raghavendra Jinning’s office burglarized and Rs 15 lakh seized; Contains 13 kg of silverware.)
शहराला लागूनच असलेल्या वळण रस्त्यावर (Ring Road) शहरातील प्रसिद्ध उद्योजक गिरीश कत्रुवार यांची राघवेंद्र जिनिंग आहे. जिनिंग परिसरातच एक इमारत असून या इमारतीत कार्यालय आहे. दि.21 जुलै बुधवार रोजी जिनिंगचे सर्व काम आटोपून कार्यालय बंद करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दि. 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता कार्यालयात चिखलाचे पायाने भरलेले ठसे व आतील सामान अस्तव्यस्त पसरले असल्याचे जिनिंग मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दिसून आले.
यानंतर घटनेची माहिती जिनिंगचे मालक गिरीश कत्रुवार यांनी पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (Police Inspector) रमेश स्वामी, सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयात जाऊन पाहिले असता कपाटात ठेवलेले रोख आठ लाख 70 हजार रुपये व देवघरातील सात लाख रुपये किमतीच्या 13 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी कार्यालयाचे दार तोडून आत प्रवेश करून चोरून नेल्याचे दिसून आले.
डीव्हीआरही पळवला
या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरेचे डी व्ही आर (DVR) ही चोरट्यांनी सोबत नेले असल्याचे घटनास्थळावर दिसून आले. दि.22 जुलैच्या रात्री पाऊस सुरू असल्याने कार्यालयातील फरशीवर चिखलाने भरलेले पावलाचे ठसे आढळून आल्याने पाच ते सात चोर असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक व ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने जिनिंगच्या प्रवेश द्वारा पर्यंत माग काढला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरु केला आहे. जिनिंगचे मालक गिरिश कत्रुवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक रमेश स्वामी करीत आहेत.
गस्त वाढविण्याची मागणी
राघवेंद्र जिनिंग मध्ये झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील बुद्ध नगर भागात मागील आठवडाभरापासून चोर येत असल्याची चर्चा आहे. या भीतीने नागरिकांनी जागरण करत गस्तही सुरू केले आहे. पोलिसांनी गस्त वाढवल्यास चोरीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे.