मराठवाडा… पात्र ओलांडणाऱ्या सख्ख्या बहीण – भावाला जलसमाधी; तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा बुडून मृत्यू.

हिंगोली दि.13 मे – मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सेनगाव (जि.हिंगोली) तालुक्यातील बोडखा येथे नदी पात्र ओलांडणाऱ्या बहिण – भावाचा तर हदगाव तालुक्यात एका तरुणाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारातील पूर्णा नदीच्या शिवारात गुलाब राठोड हे आपली पत्नी व मुलगा गोपाल राठोड (वय 10) तर मुलगी विशाखा राठोड (वय 7) यांना सोबत घेऊन उन्हाळी भुईमूग काढणीसाठी नदीपात्राच्या पलीकडील भागात मजुरीसाठी गेले होते. नदीकाठावर असलेल्या शेतात या चिमुकल्यांचे आई-वडील भुईमूग काढणीमध्ये मग्न होते. यावेळी यातील मुलगा गोपाल राठोड नदीपात्राच्या अलीकडच्या भागात होता.

पलीकडच्या भागातून लहान बहीण विशाखा येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडत होती. यावेळी तिला वाचविण्यासाठी भाऊ धावून गेला. पण, दोघेही या नदीपात्राच्या पाण्यात बुडाले. बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नदीच्या काठावर या दोघांचे मृतदेह आढळले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे बोडखा गावावर शोककळा पसरली आहे. गुलाब राठोड यांना ही दोनच अपत्ये होती.

पैनगंगा नदी पात्रात युवक बुडाला..
हदगाव तालुक्यातील वाटेगाव येथील 22 वर्षाचा नवयुवक ओंकार उत्तमराव जाधव वाटेगाव येथील रहिवासी असून पैनगंगा नदीपात्रात मोटार दुरुस्तीसाठी गेला होता. मात्र पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. हि घटना बुधवारी (दि.11) रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ओंकार हा आपल्या शेतातील पाणी देणारी मोटर नदीपात्रात असल्याने दुरुस्त करण्यासाठी गेला असता पाय घसरून नदी पात्रात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी लवकर शेतात गेलेला ओंकार हा घरी लवकर परतला नसल्यामुळे त्याचे वडील उत्तमराव हे शेतात गेले. यावेळी नदीकाठी ओमकारचे कपडे, मोबाईल व चप्पल वर दिसून आली. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील मंडळींना बोलावून घेतले व ओंकारचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

( Marathwada … Sister-brother drowned; In another incident, a young man drowned. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!