धक्कादायक …. वाढत्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कारही वेटींगवर; उस्मानाबादमधील प्रकार

उस्मानाबाद दि.15 एप्रिल- महाराष्ट्रातील (Maharashtra) वाढत्या कोरोनाचं आणखी एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्याचं याआधी अनेक शहरांमधून समोर आलं होतं. मात्र उस्मानाबादमध्ये काही अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले आहेत. एकाच वेळी फुटभर अंतरावर अनेक सरणांवर अंत्यविधी होत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
(Shocking …. Funerals on waiting due to rising death; Types in Osmanabad)
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची (Death by corona) परिस्थिती दाखवणारं हे अत्यंत दाहक चित्र आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते तीन दिवस वेळ लागत आहे. तब्बल तेरा मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे बाकी असल्याने नातेवाईकांवर मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ आली आहे.
कोरोनाचा आकडा जसा वाढत आहे, तसाच मृत्युचाही आकडा आता मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू (Death by corona) झालेल्यांचे मृतदेह नगर पालिकेकडे सोपविले जातात. त्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत मृताच्या नातेवाईकांच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.
उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीत 19 मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आले आहेत. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत जे 19 अंत्यसंस्कार झाले तेही अत्यंत दाटीवाटीने करण्यात आले, एक एक फूट जागा ठेवून सरण रचण्यात आले होते. अंत्यविधीसाठी वेटींग असल्याचे चित्र उस्मानाबाद शहरात दिसत आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. उस्मानाबादसारखं (Osmanabad) चित्र याआधी महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी पहाण्यात आलं आहे. स्मशानभूमीत जागा सोडा आता सरणासाठी लाकडं मिळणंही कठीण झाल्याची माहिती आहे, त्यामुळे कमी लाकडांमध्ये सरण पेटवावं लागत आहे. आपल्या आप्तांचा अशाप्रकारे निरोप द्यावा लागत असल्याने अनेकांना अश्रू अनावर होताना दिसत आहेत. उस्मानाबादमध्ये 4940 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत, मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे 590 रुग्ण आढळले, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयाकडून दुपारी बारापर्यंत जे मृत्यू झालेले आहे. त्यांचेच मृतदेह दिले जातात. त्यानंतर मृत्यू झालेल्यांना दुसऱ्या दिवशीच मृतदेह दिल्या जात असल्याने नातेवाईकांना प्रदिर्घ प्रतिक्षा करावी लागत आहे. एका बाजूला कोरोनाने घरातील लोक रुग्णालयात तर दुसरीकडे त्यातील एखादा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नसल्याची अनेक उदाहरण सर्रास पाहायला मिळत आहेत. मृतदेहाची मृत्यूनंतर अशी हेळसांड होणार नाही यासाठी नगरपालिकेकडून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. विद्युतदाहिनीची सोय केल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटू शकेल असे मत व्यक्त होत आहे.
शासकीय रुग्णालय केवळ सकाळीच बारा वाजेपर्यंतचे मृतदेह नगरपालिकेकडे सोपविले जात होते. मात्र त्यानंतर होणारे मृत्यू व होणाऱ्या मृतदेहाची हेळसांड पाहून आता संध्याकाळी पुन्हा मृतदेह नगर पालिकेकडे देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती डॉ. इस्माईल मुल्ला यांनी दिली. यामुळे सतत अंत्यसंस्काराचा ताण पालिका प्रशासन व मसणजोगीवर पडत आहे. तर संख्या जास्त असल्याने जागेचा प्रश्न निर्माण होत आहे.
स्मशानभुमीतील हृदयद्रावक घटनेबाबत नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी, “माझ्या प्रभागातील काल एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मदतीसाठी स्मशानभूमी मध्ये गेल्यानंतर अतिशय भयावह परिस्थिती पहायला मिळाली. तिथे अंत्यसंस्कार करायला जागा सुद्धा शिल्लक नव्हती. मसनजोगी अंत्यसंस्कार करुन पूर्णपणे थकून आजारी पडल्याचे दिसले. शेवटी काही सहकाऱ्यांना घेऊन स्वत: अंत्यसंस्काराची तयारी केली” अशी प्रतिक्रिया दिली.