अजब… चक्क ग्रामपंचायतीने घेतला ‘महिला व्याभिचारी’ असल्याचा ठराव…

गेवराईः दि.२९(प्रतिनिधी)- देशभर महिलांच्या बाबतीत समानतेचा नारा दिला जात असताना विविध प्रकारचे कायदे करण्यात येत आहेत. असे असताना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मात्र चक्क एका अत्याचार (Rape) पिडित महिलेस व्याभिचारी ठरविण्याचा ठराव घेवून तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाव घालण्याचा प्रकार ग्रामपंचायतीने केल्याचे उघडकीस आले आहे. अत्याचार पिडित महिलेचे प्रशासनाने पुनर्वसन करणे गरजेचे असताना अशा स्वरुपाचा अजब ठराव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाचेगाव ग्रामपंचायतीने चक्क एका महिलेला व्याभिचारी ठरविणारा ठराव घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेबद्दल महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी एरडगाव शिवारात एका महिलेवर अत्याचार (Rape) करण्यात आला होता. या प्रकरणी चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याचा राग मनात धरून गावातील लोकांनी या महिलेला गावातून हाकलून देण्याकरिता चक्क ठराव घेतला. या ठरावात त्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविण्यात आले. येवढेच नाही तर दि.२५ डिसेंबर रोजी गेवराई पोलीस (Police) ठाण्यात आपल्याला या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गावातील एका व्यक्तीने फिर्याद दिली. त्यावरून सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच सदर महिला वारंवार गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देते म्हणून सदर महिलेवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पाचेगाव च्या ग्रामस्थांनी सोमवारी बीडच्या पोलिस (Police) अधीक्षकांना दिले. सदरील प्रकरण समोर येताच याचे पडसाद जिल्ह्यात दिसुन येत असून महिलावर्गात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कोणत्याही गावाला अथवा ग्रामपंचायतीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार नाही. तसेच संबंधित ठराव घेणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सोमेश्वर कारके व सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.