बाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह २६ स्वॅब अहवालाची आज प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) आज शहरातील दोन बाधित रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या डॉक्टरसह २६ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. गेल्या तीन दिवसांत शहरात सहा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे दहशत निर्माण झाली असली तरी अनेक जन नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसुन येत आहे.
गेल्या तीन दिवसांत आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमुळे शहरात चांगलीच दहशत दिसत आहे. यामुळे नगर परिषदेने ध्वनीक्षेपकातून बाजारासह शहरभर लोकांत जागृती करत नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे कंटेनमेंट झोन मध्ये लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज शहरातील बाधितांच्या संपर्कातील डॉक्टरसह इतर २६ लोकांचे स्वॅब काल तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त होणार आहे. या अहवालाकडे सर्वाच्या नजरा असुन आजही आरोग्य विभागाकडून संपर्कातील लोकांचे स्वॅब पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.