बीडीएस करणाऱ्या तरुणीचा शेत तळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

भोकरदनः दि.५(प्रतिनिधी)- भोकरदन तालुक्यातील इब्राईमपूर येथे शेत तळ्याच्या भिंतीवरून चालताना पाय घसरून पडल्याने दंतवैद्यक (BDS) शास्त्राच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरूणीचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवार दि.४ रोजी दुपारी घडली.
भोकरदन शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या इब्राईमपूर येथील शेतात सिधूसिंग डोभाळ यांचे कुटुंब राहते. औरंगाबाद येथील बिडीएसच्या (BDS) दुसऱ्या वर्षात शिकत असलेली पुजा (२०) लॉकडाऊनमुळे मागील नऊ ते दहा महिन्यांपासून घरीच आहे. सोमवारी दुपारी वहिनीसोबत शेत तळ्यावर गेली. शेततळ्याच्या भिंतीवर चालत असताना अचानक तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. यावेळी सोबत असलेल्या वहिनीने आरडाओरड केला मात्र तेथे कोणीही नसल्याने मदत मिळू शकली नाही. माहिती मिळताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला. उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर डॉ. दीपक सोनूने यांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. घटनास्थळी पोलीस (Police) उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी भोकरदन पोलीस (Police) ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.