केज तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली; पोलिस तपासात धक्कादायक माहिती आली समोर.

केज दि.28 एप्रिल – केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात (दि.3) एप्रिल रोजी एक जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कसलाही पुरावा नसताना अत्यंत शिताफीने खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आडस-होळ रस्त्यावर (दि.3) एप्रिल सकाळी लाडेवडगाव शिवारात कडबा टाकून जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली होती. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर मोठं आव्हान होतं. तसेच या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी डॉ. संदीप दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला.
कसल्याही प्रकारचा सुगावा नसताना तसेच ओळख पटविण्यासाठी कोणताही पुरावा नसताना याचा तपास लावणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून एएसपी पंकज कुमावत (ASP Pankaj Kumawat) यांनी तांत्रिक बाबी वापरुन प्रथम मृतदेहाची ओळख पटविली हा मृतदेह केज (Kaij) तालुक्यातील औरंगपूर येथील विठ्ठल (अशोक) धायगुडे (वय 35 वर्ष) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी विठ्ठल विषयी नातेवाईकांकडे चौकशी केली. तसेच घरातील व्यक्ती बेपत्ता असताना कोणाची तक्रार नाही. त्यामुळे पोलीसांना नातेवाईकांवरच संशय आला. या चौकशीतून मयताची पत्नीनेच अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने विठ्ठलचा काटा काढल्याचे समोर आले. यावरून आरोपी पत्नी सुमिदा विठ्ठल धायगुडे, प्रियकर रामदास किसन शितळकर दोघे रा. औरंगपूर ता. केज यांना अटक केली.
या दोन्ही आरोपीनां आज न्यायालया समोर उभे करण्यात येणार आहे. कसलाही पुरावा नसताना पोलिसांनी (Police) मोठ्या शिताफीने खुनाचा छडा लावला. तपास कार्यात असलेले पोलिस कॉन्स्टेबल (Police Constable) अनिल मंदे यांनी सदर तपास आपल्या सेवेतील सर्वात महत्वाचा तपास ठरल्याची प्रतिक्रिया दिली.
( ‘That’ body was identified in Kaij taluka; Police investigation revealed shocking information. )