अबब…भारतातील ३० कोटीपेक्षा जास्त लोकांना होवून गेला कोरोना…… महाराष्ट्राचे गृहमंत्री आले पॉझिटीव्ह

नवी दिल्ली: दि.५- देशात आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची (corona)बाधा होऊन गेली असण्याची शक्यता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने केलेल्या तिसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात व्यक्त केली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोरोना पॉझिटीव्ह (Positive) आले असून देशमुख यांनी ट्वीट करुन प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले आहे. (Anil Deshmukh tested corona positive).
देशातील १.३५ अब्ज लोकसंख्येचा विचार केला तर दर चार लोकांमागे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. देशात १ कोटी ७ लाख कोरोना रुग्ण नोंदविले गेले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ३० कोटींपेक्षा अधिक असावा असेही या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे. १७ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत तिसरे सिरो सर्वेक्षण १८ वर्षे वयावरील २१.४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता. आरोग्य सेवकांमध्ये कोरोनाच्या फैलावाचे प्रमाण २५ टक्के होते. त्यातील डॉक्टर, नर्सेसमध्ये कोरोना फैलावाचे प्रमाण २६.६ टक्के, आरोग्य क्षेत्रातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हे प्रमाण २४.९ टक्के होते. आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दुसऱ्या सिरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार शहरातील झोपडपट्ट्या, बिगरझोपडपट्ट्यांच्या भागात कोरोना फैलावाचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत दुप्पट होता हा धोका अद्यापही कायम असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोरोना (corona) पॉझिटीव्ह
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण होवून पॉझिटीव्ह (Positive) झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी माझी प्रकृती चांगली असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. (Anil Deshmukh tested corona positive).