बीडमध्ये शिक्षकाच्या आत्महत्येने शैक्षणिक गोटात खळबळ ; सुसाईड नोटमध्ये दोघांची नावे…

बीड दि.7 एप्रिल – बीड (Beed) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने सुसाईड नोट लिहिली असून यात दोघांच्या नावाचा समावेश आहे.
बीड शहरातील पालवन चौक परिसरात सदर घटना घडली आहे. राहुल ईश्वर वाघमारे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. बीड शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात राहुल वाघमारे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी वाघमारे यांनी सुसाईड नोट (suicide note) लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोट मध्ये प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि त्यांचा सहकारी मुन्ना लोंढे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांना (Police) माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
काय आहे सुसाईड नोटमध्ये ?
मयत राहुल वाघमारे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून मिळालेल्या माहितीनूसार यामध्ये खोटे पुरावे तयार करुन माझ्या घरात कॅमेरे बसविले आहेत. वातावरण कसं आहे? हे पाहून मला कोणकोणत्या प्रकरणात गोवता येईल याचा अभ्यास केला आणि खोटे पुरावे तयार केले. राजकीय, सामाजिक आणि शासकीय माध्यमातून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं राहुल वाघमारे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. माझ्या मृत्यूमध्ये प्रा. बाळासाहेब लाखेच 101 टक्के दोषी आहे. माझ्या आई-बहिणीची काळजी घ्यावी, ही न्यायदेवतेस प्रार्थना करतो, असंही सुसाईड नोटमध्ये शेवटी नमूद केलं आहे.
( Teacher’s suicide in Beed sparks uproar in educational circles; The names of the two in the suicide note … )