ही तर तिसऱ्या लाटेची सुरुवात…. आरोग्य मंत्री.

मुंबई दि.29 जुलै – केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी-नुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,654 नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी तब्बल 4 महिन्यांनंतर 24 तासांत आढळलेल्या नव्या बाधितांचा आकडा प्रथमच 30 हजारांच्या आत आला होता. मात्र बुधवारी उपलब्ध माहितीनूसार रुग्णसंख्या मंगळवारच्या रुग्णसंख्येपेक्षा 47 टक्क्यांनी अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Third wave of corona) शक्यता वर्तवली आहे.
(This is the beginning of the third wave … Health Minister.)
केरळ येथे रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीकडे देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून पाहिलं जाऊ शकतं असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री (Health Minister) राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही यासाठी तयारी करत आहोत. केंद्र सरकार व आयसीएमआर (ICMR) तज्ज्ञांच्या सूचनांनुसार आम्ही बालकांमधील कोरोना प्रादुर्भावाबाबत (corona outbreak) विशेष तयारी करत आहोत. आम्ही ऑक्सिजन बेड्स, वैद्यकीय कर्मचारी व औषधांची जुळवाजुळव करून ठेवली आहे.’ अशी माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन कोरोना बाधितांचे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यासाठी जलद गतीने लसीकरण (vacccination) करणे गरजेचे आहे, यासाठी आम्हाला केंद्र सरकारने अधिक प्रमाणात कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध करून द्यायला हव्यात. लसीकरण वेगाने झाल्यास तिसऱ्या लाटेस अटकाव करणे शक्य होईल.’ असं देखील टोपे म्हणाले.
गेल्या 24 तासांत देशात आढळून आलेल्या 43,654 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळ (Kerala) राज्यात सापडले आहेत. 24 तासांत केरळमध्ये 22,129 रुग्ण आढळले. देशात सापडणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांच्या 50 टक्के रुग्ण केरळ, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 6,258 तर कर्नाटकात 1,501 रुग्ण आढळून आले.