चौदा तासानंतर बिबट्याचा छावा जेरबंद….

जिंतूर: दि.२०- जिंतूर तालुक्यातील वाडी शिवारातील एका विहिरीत आढळलेल्या बिबट्याला वन विभागाच्या (Forest department) पथकाने १४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले असून, या बिबट्याला नागपूर येथील राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
जिंतूर (Jintur) तालुक्यातील वाघी धानोरा परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महादेव बाबासाहेब पवार यांच्या विहिरीतील एका कपारीत बिबट्याचा छावा असल्याचे दिसून आले. त्यानंतर या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे (Forest department) पथक दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही पथकाने सोबत आणला होता. मात्र हा बिबट्या (Leopard) विहिरीत असल्याने पिंजरा विहिरीत सोडण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आली. या बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी रात्रभर पथकाने प्रयत्न केले. परभणीसह हिंगोली, नांदेड, वसमत, सेलू, मानवत, व जिंतूर (Jintur) येथील वन विभााचे सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी वडी शिवारात दाखल झाले. विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांच्यासह वनक्षेत्रपाल जे.डी. कच्छवे, वनपाल गणेश घुगे, काशीनाथ भंडारे, देवकते, पोलवाड, वनरक्षक शेख आमेर, सावंत, वन कामगार रामा राठोड, माणिक राठोड आदींनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. अखेर २० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या (Leopard) पिंजऱ्यात अडकल्यानंतर हा पिंजरा विहिरी बाहेर काढण्यात आला. दरम्यान पकडलेल्या बिबट्याला नागपूर येथील राष्ट्रीय अभयारण्यात नेऊन सोडले जाणार असल्याची माहिती वनपाल गणेश घुगे यांनी दिली.